गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणार्‍यांना पकडले रंगेहात

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गॅसच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत अवैधरीत्या आणि चढ्या भावाने गॅस विक्री करताना गॅस एजन्सीच्याच तीन कर्मचार्‍यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकडे यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कर्मचार्‍यांकडून गॅस वितरणचे वाहन जप्त करण्यात आले असून त्यामध्ये भरलेल्या ५ आणि रिकाम्या ४३ अशा ४८ टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
जळगाव रोडवरील आदित्य गॅस एजन्सीच्या पाठीमागे असलेल्या ऑडिटर सोसायटीमध्ये पाण्याच्या टाकीजवळ घरगुती गॅसची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. येथे छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये धीरज फुलचंद बारवाल, आनंद छगन अंबिलढगे आणि उत्तम देवराव कसारे यांचा समावेश आहे. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुरवठा अधिकारी वाकडे यांना दिले. त्यांनी इतर कर्मचार्‍यांसह तत्काळ घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी एका वाहनात भारत कंपनीचे एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर आढळून आले. गॅस एजन्सी आणि ग्राहकांच्या गॅस बुकिंगबाबत विचारणा केली असता, आदित्य गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे सांगितले.